Dilip Walse Patil: आरोप सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवन सोडणार! दूध भेसळ प्रकरणावर दिलीप वळसे पाटलांची घोषणा
Dilip Walse Patil: अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांचा तपास सुरू असताना खोटे आरोप करून बदनामीचे राजकारण सुरू; वळसे पाटलांचा फौजदारी कारवाईचा इशारा.

Dilip Walse Patil – दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. दूध भेसळ प्रकरणाशी संबंध जोडणे म्हणजे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. दूध भेसळ किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर कृत्याशी आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास आपण एका क्षणाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
व्हिडिओ संदेशाद्वारे बोलताना आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणा दूध भेसळ प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सक्षम आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती,संस्था किंवा व्यावसायिकाला संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून कोणताही पुरावा नसताना आपले नाव या प्रकरणाशी जोडून राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आरोपांमुळे जनतेत संभ्रम निर्माण केला जात असून हे नियोजनबद्ध षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी केला.
बदनामीचे राजकारण थांबवावे…
विरोधकांनी विनाकारण बदनामीचे राजकारण थांबवावे, अन्यथा संबंधितांविरोधात फौजदारी कारवाईसह अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आपण कायम पारदर्शक आणि जनतेच्या विश्वासावर आधारित राजकारण केले असून अखेर सत्य समोर येईल, असा विश्वास दिलीप वळसे – पाटील यांनी व्यक्त केला.





