Local Body Election : मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच; संभाव्य तारीख पाहा
Local Body Election : राज्यातील रखडलेल्या 22 जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने निवडणूक घेण्याची तयारी दर्शवली असून 50 टक्के आरक्षण मर्यादेनुसार आरक्षणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत.

Local Body Election : राज्यातील रखडलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने या निवडणुका घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेनंतर या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणासह एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडल्यामुळे 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या होत्या. जानेवारी महिन्यात 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले; मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती.
आता सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवत निवडणूक घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयात दर्शविल्याने या निवडणुकांबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.
आरक्षणाच्या समीकरणात मोठे बदल –
50 टक्क्यांच्या मर्यादेनुसार नव्याने आरक्षण निश्चित करावे लागणार असल्याने अनेक जिल्ह्यांतील आरक्षित जागांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम ओबीसी आरक्षणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर जिल्हा परिषदेत पूर्वी 33 जागा आरक्षित होत्या. नव्या आराखड्यानुसार त्या कमी होऊन 27 जागांपर्यंत मर्यादित राहू शकतात.
जिल्हा परिषदांसोबत नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकाही –
जिल्हा परिषद निवडणुकांसोबतच मुदत संपलेल्या 105 नगरपंचायती आणि सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वर्षअखेरीस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मोठा राजकीय माहोल निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय पक्षांनी सुरू केली तयारी –
जानेवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने प्रभावी कामगिरी केली होती. आता उर्वरित निवडणुकांमध्ये विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या भागात काँग्रेसला कामगिरी सुधारण्याची संधी मानली जात आहे.
दरम्यान, ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित –
पालघर,ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.





