Mumbai Rain Update : पावसाचा अलर्ट! खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे
Mumbai Rain Update : मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आवाहन

Mumbai Rain Update : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तर अनेक महामार्गावर दरड कोसळण्याच्या आणि पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देशित केले आहे. तसेच, शासकीय/ निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आवाहन (Mumbai Rain Update)
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वाचे आवाहन केले आहे.
“अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करु नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये. पावसाच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे,” असे फडणविसांनी सांगितले आहे.
….गेलेले जीव परत येणार नाहीत (Mumbai Rain Update)
“गेल्या दोन-तीन दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत, त्याबाबत कारवाई झाली आहे. यापूर्वी पावसाच्यादृष्टीने यंत्रणांनी तयारीही केली होती. राजकीय बोलायच असेल तर मागच्या काळात किती मृत्यू झाले याची आकडेवारी मी देऊ शकतो. पण त्याने गेलेले जीव परत येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला या सगळ्या परिस्थितीकडे संवेदनशीलपणे पाहावे लागेल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा:
Alandi News : इंद्रायणीला पूर; आळंदीकडे येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन






