पुणे – नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत राजबीर पनवर याच्या नाबाद १२५ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाने तेलंगणा हायकोर्ट संघाचा १३१ धावांनी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्लब येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१६ धावांचा डोंगर उभा केला. राजबीर पनवर याने आजही जबरदस्त फलंदाजी करताना ५८ चेंडूत १२ चौकार आणि ९ षटकारांसह १२५ धावांची खेळी केली. काल याच मैदानावर राजबीर याने नाबाद १४९ धावांची खेळी करून स्पर्धेतील पहिले शतक नोंदविले होते. आज त्याने सलग दुसरे शतक नोंदवित आपला फॉर्मने तेलंगणा संघाच्या गोलंदाजांची वाताहत केली. शक्ती भक्ती (३१ धावा) आणि कुणाल सिंग (नाबाद ३४ धावा) यांनी दुसर्या बाजूने राजबीर याला सुरेख साथ दिली. या आव्हानासमोर तेलंगणा हायकोर्ट संघाचा डाव ८५ धावांवर गडगडला. सुप्रिम कोर्ट संघाच्या मनीष लांबा याने १३ धावात ५ गडी बाद केले.
काल मोशी येथील हजारे क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात विवेक देशमुख याच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर महाराष्ट्र हायकोर्ट संघाने केरळ हायकोर्ट संघाचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये जिंकूनही केवळ धावगती कमी असल्याने महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. या गटातून तेलंगणा संघाने ४ गुण आणि १.२७ अशा सरस धावगतीच्या आधारे उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
वकीलांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा : सुप्रिम कोर्ट संघाची विजयांची हॅट्ट्रीक…
महाराष्ट्र संघाचे ४ गुण आणि १.१५ अशी धावगती होती. स्पर्धेचा अंतिम सामना आज (शुक्रवार) गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सकाळी दहा वाजता होणार असून त्यानंतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल, अशी माहिती स्पर्धेचे संचालक उमेश चांडोले यांनी दिली.