– गणेश आंग्रे
पुणे – जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी भूमि अभिलेख विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणार आहे. जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात 77 ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. तर कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग फक्त 30 सेंकदात घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमिन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
येत्या 15 दिवसांत कॉर्स स्टेशन कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर प्रत्यक्षात कॉर्सच्या मदतीने जमिन मोजणीचे काम येत्या मार्च महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. सध्यस्थितीत पाच एकर जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. तर कॉर्स जीपीएस रिंडीग लवकर मिळत असल्याने पाच एकरचे क्षेत्र मोजण्यासाठी फक्त अर्धातास लागणार आहे.
सध्यस्थितीत जमीन मोजणीसाठी ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. संबधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांक्ष व रेखांश घेतले जाते. या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात.
जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेंकदात घेता येणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले आहे.
जिल्ह्यात 4 कॉर्स स्टेशन
जिल्ह्यात शिरुर, मावळ, पुरंदर आणि दौंड या चार ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारले आहे. एक कॉर्स स्टेशन आपल्या भोवतीच्या 35 किलोमीटरच्या त्रिजेच्या क्षेत्रात जीपीएस रिडींग देणार आहे. कॉर्सचे रिडींग रोव्हर रिसिव्ह करणार असून हे रीडिंग टॅबमध्ये दिसणार आहे. राज्यात 400 रोव्हर घेतले जाणार आहे.
ठळक वैशिष्टे
– कॉर्स स्टेशन सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नवीन नकाशा तयार करण्यासाठी मदत होणार
– जीपीस रिडींग अचूक येणार
– जमीन मोजणीत अधिक अचूकता
– जमिनीचे पोट हिस्से करणे सोपे होणार
– एका जमिनीची अनेक जणांना विक्री करण्याच्या गैरप्रकाराला आळा