नवी दिल्ली – जगभरात सध्या गुगलवर सर्वाधिक ट्रेंड होत आहे ते म्हणजे लक्षद्वीप. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यानंतर लक्षद्वीप जगभरात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे. या भेटीनंतर जगभरातील लोक लक्षद्वीप सर्च करत आहे. यामुळे गुगल सर्चमध्ये मागील 20 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जानेवारीला केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली. यावेळी त्यांनी स्नॉर्कलिंगमध्ये हात आजमावत असल्याचे अनेक छायाचित्रे शेअर केली. यानंतर सेलिब्रेटींसह भारतीयांनी स्थानिक समुद्रकिनारी स्थळे आणि इतर पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी उघड समर्थन दिले आहे. लक्षद्वीपमध्ये समुद्रकिनारी पर्यटनाला चालना देण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनालाही त्यांनी पाठिंबा दर्शवला.
याचा परिणाम मालदीववरही दिसून येत आहे. भारतातील पर्यटक जास्त करून मालदीवला भेट देतात. मागील वर्षी 2.09 लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. परंतु आता गुगल सर्चमध्येही पर्यटक मालदीवऐवजी लक्षद्वीप सर्च करत असून, हा मागील 20 वर्षातील सर्वाधिक सर्च केलेला शब्द आहे. त्यामुळे सध्या ट्रेंडिंगमध्ये लक्षद्वीप असल्याचे दिसून येत आहे.
लक्षद्वीप बनणार पर्यटन केंद्र
आगामी काळात मालदीव नव्हे, तर लक्षद्वीप हे भारतीय पर्यटकांचे आवडते ठिकाण बनल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीप हे गुगलवर सर्वाधिक ट्रेंडिंग डेस्टिनेशन ठरले आहे. विशेष म्हणजे लक्षद्वीप गेल्या महिन्यात सर्चमध्ये मालदीवपेक्षा फार मागे होते. परंतु आता लक्षद्वीपने गुगल सर्चमध्ये 20 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.
लक्षद्वीप बेटावर कसे जायचे ?
लक्षद्वीपबाबत एवढी माहिती मिळाल्यानंतर अनेकजण आता लक्षद्वीप जाण्याच्या बेतात असतील. परंतु लक्षद्वीपला नेमकं जायाचे कसं हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर सोप्पं आहे. तुम्ही ट्रेन किंवा फ्लाइटने कोचीला पोहोचू शकता. कोचीला पोहोचल्यानंतर लक्षद्वीपला जाण्यासाठी जहाजाने जावे लागेल.