lady polling officer : 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिवळ्या साडीतील एक महिला निवडणूक अधिकारी (lady polling officer) चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात या महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होत. ‘रीना द्विवेदी’ (Reena Dwivedi) असं त्यांचं नाव असून लखनऊ येथील रहिवासी असलेल्या रीना यांना शहरातीलच मोहनलालगंज विधानसभा मतदारसंघात ड्युटी देण्यात आली होती.
रीना द्विवेदी इतकी प्रसिद्ध झाली की इंटरनेटवर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठ्या प्रमाणात वाढली. रीना द्विवेदी हिच्याप्रमाणेच आता आणखी एक पोलिंग ऑफिसर तिच्या हटके लुकमुळे चर्चेत आली आहे. 2023च्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये ही महिला पोलिंग ऑफिसर म्हणून काम करत असून, तिला पाहून अनेकांनी पिवळ्या साडीतील रीना द्विवेदी यांची आठवण झाली आहे.
मध्यप्रदेशमधील सीएम राइज स्कूल बिस्तान येथील ‘विराज नीमा’ (viraj neema) असं या महिलेचं नाव असून या प्राथमिक शिक्षक आहेत. लोकशाहीच्या मोठ्या सणात आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या सज्ज झाल्या. विराज नीमा या त्यांना नेमून दिलेल्या नूतन नगर येथील बूथ केंद्रावर दाखल झाल्या. त्यावेळी त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.
विराज नीमा (viraj neema) या मध्य प्रदेशातील खरगोन येथील पीजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मतदानाचे साहित्य घेण्यासाठी आल्या होत्या. गुलाबी रंगांची साडी, डोळ्यावर काळा चष्मा, हातात चमचमते घड्याळ आणि एका हातात EVM मशीन असा विराज निमा (viraj neema) यांचा हा लूक पाहण्यासारखा होता.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान बोलताना विराज नीमा म्हणाल्या की, ‘मी खरगोनमधील सरकारी शाळेत शिकवत असून, या निवडणुकीत मला खरगोन जिल्ह्यातील नूतन नगर बूथ सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. या कारणास्तव मी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह पीजी कॉलेजमध्ये निवडणूक साहित्य घेण्यासाठी गेली होती.
यापूर्वीही निवडणूक ड्युटीवर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. निवडणुका हाही आपल्या लोकशाहीचा महान सण आहे. म्हणूनच मी दिवाळी आणि इतर सणांना ज्यापद्धतीने माझा उत्तम पोशाख परिधान करते, असाच पोशाख यावेळी देखील परिधान केला होता. आणि त्यामुळेच निवडणुकीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी उत्साहाने सहभागी झाले’. असं त्या म्हणाल्या.