दुबई – कुवेतच्या दिवंगत अमीरचे थोरले पुत्र आणि सुधारणावादी नेते शेख नासेर सबाह अल सबाह यांचे आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. कुवेतच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. शेख नासेर यांनी संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान यांच्यासह विविध शासकीय पदे वर्षानुवर्षे भूषविली होती.
सप्टेंबरमध्ये त्यांचे वडील 91वर्षीय शेख सबा अल अहमद अल सबाह यांच्या निधनानंतर युवराजपदाचे प्रमुख दावेदार तेच मानले जात होते.
त्यांच्या महत्त्वाकांक्षी मेगा-प्रकल्प आणि भ्रष्टाचारविरोधी प्रयत्नांना लोकांनी पाठिंबा दर्शविला होता. लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनी त्यांचे काका शेख मेशल अल अहमद अल जबर अल सबाह यांनाही मागे टाकले होते. मात्र वारस म्हणून नासेर यांच्या ऐवजी शेख मेशल यांचीच वर्णी लागली होती.
शेख नासेर यांचा मृत्यू कसा झाला याचा उल्लेख सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तामध्ये केलेला नाही, परंतु दोन वर्षांपूर्वी फुफ्फुसांचा ट्यूमर काढून टाकल्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसल्याचे बोलले जात होते.
कुवेतची 90 टक्के अर्थव्यवस्था तेलाच्या निर्यातीवरच अवलंबून आहे. मात्र खोल समुद्रातील बंदर विकसित करून बिझनेस हब निर्माण करण्यासाठी शेख नासेर यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या विकासकामांमुळे शेजारील सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये कुवेतलाही मागे टाकले होते.