लंडन – ब्रिटन मध्ये नवीन विषाणुंची मोठ्या प्रमाणात लागण सुरू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर युरोपातील देशांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांवर बंदी घालण्याचे काम सुरू केले आहे. नेदरलॅंडने प्रथम अशी बंदी घातली आहे.
या पाठोपाठ जर्मनीनेही ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांना बंदी घालण्याचा निर्णय घ्यायचे ठरवले आहे. बेल्जीयमनेही ब्रिटनहून येणारी विमाने आणि रेल्वे आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटन मध्ये नवीन विषाणुंची जी लागण सुरू झाली आहे ती आटोक्याच्या बाहेर जात असल्याचे ब्रिटीश सरकारने घोषित केल्याने आम्हालाही या बाबतीत दक्षता घ्यावी लागत आहे त्यामुळे आम्हीही ब्रिटीश प्रवासी विमानांना बंदी घालत आहोत असे इटालिनेही म्हटले आहे.
ब्रिटन मध्ये या विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा नव्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून आज एक तृतीयांश ब्रिटन लॉकडाऊन खाली आणण्यात आहे असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सांगितले की नवीन विषाणुंचा प्रसार अत्यंतच घातक ठरत असल्याने अनेक ब्रिटीश नागरीकांना आपला ख्रिसमसचा प्लॅन रद्द करावा लागेल.
सध्याची स्थिती फारच भयानक आहे. लस येईपर्यंत ही स्थिती हाताळणे आमच्यासाठी एक मोठेच आव्हान होऊन बसले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटन मध्ये सध्या प्रादुर्भाव करीत असलेला नवीन विषाणु करोनाच्या विषाणुंपेक्षा 70 टक्के अधिक वेगाने सर्वत्र पसरतो आहे.