वॉशिंग्टन – जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनच्या ज्या प्रांतातून करोनाचा प्रसार झाला त्या ठिकाणी जाऊन तपास केला जाणार होता पण या तपास कामात आता चीनने आडकाठी आणायला सुरूवात केली आहे असा आरोप अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी हा आरोप करताना सांगितले की करोनाच्या बाबतीत अजूनही चीन चुकीची व दिशाभुल करणारी माहिती देत असून जागतिक आरोग्य संघटनेने याच्या तपासाचे जे काम हाती घेतले आहे त्या कामात ते अडथळा आणत आहेत.
त्यांनी म्हटले आहे की चीनच्या करोना लसीच्या संबंधातही पारदर्शकता बाळगली गेलेली नाही. या लसीच्या क्लिनीकल ट्रायल बद्धलही नीट माहिती दिली गेली नसून चीनची ही लस आता पुन्हा जगासाठी घातक ठरणार आहे.
पॉम्पेओ म्हणाले की करोनामुळे जगातील दहा लाखांपेक्षा अधिक लोक प्राणाला मुकले असून हा रोग नेमका कोठून आणि कसा पसरला याच्या तपास कामात चीनने सहकार्य केले पाहिजे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्यावर दबाव आणला गेला पाहिजे.
चीनने असे केले नाहीं तर पुन्हा त्या देशांतून आणखी एखादा रोग जगभर पसरण्याचा धोका आहे तो धोका आपण पुन्हा स्वीकारायचा काय असा सवालही पॉम्पेओ यांनी केला आहे. जगभर जी करोनाची महामारी पसरली आहे हा केवळ काही अपघात नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.
चीनकडून या विषाणुंचा जगभर असलेल्या धोक्याची माहिती देणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञ आणि पत्रकारांना चीन मध्ये शिक्षा दिली जात असल्याची तक्रारही त्यांनी केली.