पवन मावळ, (वार्ताहर) – कृषिभूषण महाएफपीओ स्टार्टअप फेडेरेशन, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर, कृषिभूषण एक्सलन्स अवॉर्ड 2024 चा उत्कृष्ठ कृषी विस्तारकार्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार वडगाव-मावळचे कृषी पर्यवेक्षक नविनचंद्र बोऱ्हाडे यांना प्रदान करण्यात आला.
मावळ तालुक्यात कृषी विभागात गेली दहा वर्षे त्यांनी शून्य मशागत शेती व सेंद्रिय कार्बन संवर्धन या विषयात पुणे जिल्ह्यात व विशेषतः मावळ तालुक्यात शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. तसेच जमीनचे आरोग्य संवर्धन व मजुरांची बचत यामुळे एसआरटी पद्धत शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करण्यात योगदान दिले आहे.
चारसूत्री लागवड, शेतकऱ्यांना सर्वं पिकांबाबत किड व रोगाबाबत मार्गदर्शन केल्याने ते शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय आहेत. त्यांना कृषी विभाग, सगुणा बाग, कर्जत येथील पुरस्काराने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.
कृषी विभागामध्ये काम करताना शेतकऱ्यासाठी भात पिकामध्ये वेगवेगळ्या लागवड पद्धती रुजवल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने काम करता आले. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, सल्ला उत्पादन वाढीसाठी काम करता आले. पुरस्कार मिळाल्याने काम करण्यासाठी आणखी उत्साह येतो, असे नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी सांगितले.