कोलकाता -कर्णधार नितीश राणा, आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जवर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार फटकावला व विजय साकार केला. त्यापूर्वी रसेलने वादळी फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले.
विजयासाठी आवश्यक 180 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरुवात जेसन रॉय व रेहमनुल्ला गुरबाज यांनी सावधपणे केली. या जोडीने 38 धावांची सलामी दिली. गुरबाज 15 धावांवर परतला. त्यानंतर रॉयने कर्णधार नितीश राणासह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. रॉय स्थिरावलेला असताना 38 धावांवर परतला. राणाने व्यंकटेश अय्यरच्या साथीत संघाला शतकी मजल मारून दिली. अय्यर आततायी फटका मारून बाद झाला. यंदाच्या मोसमात त्याच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. त्याला सातत्याने अपयश येत आहे. दुसरीकडे राणाने जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने आंद्रे रसेलच्या साथीत विजयाकडे कूच केली. दरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी त्याच्याकडून चूक झाली व तो 51 धावांवर बाद झाला. त्याने 38 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला.त्यानंतर रिंकू सिंग व रसेलने सामना कोलकाताच्या आवाक्यात आणला.
रिंकूपेक्षा रसेलने जास्त आक्रमक फलंदाजी केली. त्याने रिंकूच्या साथीत पाचव्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. संघाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना रसेल धावबाद झाला. त्याने 23 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांसह 42 धावा केल्या. त्यानंतर रिंकूने अखेरच्या चेंडूवर चौकार फटकावला व कोलकाताचा विजय साकार केला. रिंकूने नाबाद 10 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 21 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, कर्णधार शिखर धवन व तळात शाहरुख खानने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे सोमवारी आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जला 20 षटकांत 7 बाद 179 धावा अशी समाधानकारक मजल मारता आली.
पंजाबचा कर्णधार शिखऱ धवनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचाच अपवाद वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली. हर्षित राणाने पहिल्या दोन षटकांत प्रभसिमरन सिंग व भानुका राजपक्षे यांना तंबूचा रस्ता दाखवला. प्रभसिमरनने 12 धावा केल्या तर राजपक्षेला खातेही उघडता आले नाही.
पाठोपाठ 15 धावांवर लियाम लिव्हिंगस्टोनही परतला. एका बाजूने धवन भक्कमपणे फलंदाजी करत होता. जीतेश शर्माने धवनला थोडीफार साथ देत संघाला शतकी मजलमारून दिली. मात्र, तोदेखील आततायी फटका मारून 21 धावांवर बाद झाला. धवनने आपले अर्धशतक साकार केले. त्यानंतर वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात तो 57 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 1 षटकार फटकावला. सॅम कुरेननेही निराशा केली.
ऋषी धवननेही थोडी चमक दाखवली मात्र, कोलकाताच्या वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर पंजाबची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. मात्र, त्यानंतर शाहरुख खान व हरप्रीत ब्रार यांनी संघाचे दीडशतक फलकावर लावले. या जोडीने आठव्या गड्यासाठी 16 चेंडूत 40 धावांची भागीदारी केली. त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर पंजाबला 7 बाद 179 अशी समाधानकारक मजल मारता आली. शाहरुख 8 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 21 धावांवर नाबाद राहिला. हरप्रीतने 9 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 17 धावा केल्या.
धवनची एकाकी झुंज
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन याने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. प्रमुख फलंदाज पाठोपाठ बाद होत असताना धवनने मात्र, कोलकाताच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. त्याने जीतेश शर्मासह भागीदारी करत डावही सावरला. मात्र, धवनही अनावश्यक फटका मारून नितीश राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यंदाच्या स्पर्धेत धवनच पंजाबच्या फलंदाजीचा भार एकटाच वाहात आहे.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 7 बाद 179 धावा. (शिखर धवन 57, जीतेश शर्मा 21, ऋषी धवन 19, शाहरुख खान नाबाद 21, हरप्रीत ब्रार नाबाद 17, वरुण चक्रवर्ती 3-26, हर्षित राणा 2-33, नितिश राणा 1-7, सुयश शर्मा 1-26). कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 5 बाद 182 धावा. (नितीश राणा 51, आंद्रे रसेल 42, जेसन रॉय 38, रिंकू सिंग नाबाद 21, राहुल चहर 2-23, हरप्रीत ब्रार 1-4, नाथन एलिस 1-29).