भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा नियमित सदस्य असलेला सिद्धार्थ देसाईने खूप कमी कालावधीत प्रो कबड्डी लीगमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. सिद्धार्थ चपळ आणि वेगवान चढाईसाठी ओळखला जातो.
सिद्धार्थचा जन्म कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथे 5 डिसेंबर 1991 रोजी कबड्डीची आवड असलेल्या कुटुंबात झाला. सिद्धार्थला लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. गावात त्याने सुरुवातीला कबड्डीचे धडे गिरवले. सिद्धार्थ देसाईचा मार्ग सोपा नव्हता, पण त्याने मेहनतीच्या बळावर हे साध्य करुन दाखवले आहे. सिद्धार्थ शिक्षणातही मागे नाही. त्याने ‘ बीएससी फिजिक्स’मध्ये पदवी घेतली आहे.
सिद्धार्थने शालेय संघासाठी चढाईपटू म्हणून कारकिर्द सुरु केली. पुढे तो राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. राज्यस्तरीय स्पर्धेत त्याच्या चढाईतील कौशल्य आणि आक्रमक कामगिरीमुळे त्याला प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात संधी मिळाली.
सिद्धार्थच्या व्यावसायिक कबड्डी कारकीर्दीची सुरुवात यू मुंबातून झाली.
त्याला यू मुंबाने 6व्या हंगामात 36.4 लाख रुपयांना खरेदी केले होते. या हंगामात त्याने 21 सामन्यांत चढाईमध्ये 218 गुण मिळवले. त्याच्या पहिल्या हंगामातील चमकदार कामगिरीमुळे 7व्या हंगामात तेलुगू टायटन्सने 1.45 कोटी रुपयांची बोली लावत आपल्याकडे खेचले. तेलुगू टायटन्स विश्वास सार्थ ठरवत सिद्धार्थने 7व्या हंगामात 22 सामन्यांमध्ये 217 गुण मिळवले. आता प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामासाठी 1.30 कोटी रुपये देऊन टायटन्सने त्याला संघात कायम ठेवले आहे.
सिद्धार्थ देसाईची कामगिरी :
समाने-45
एकूण गुण-467
सुपर 10-24
चढाईतील गुण-460
बचावातील गुण-7