नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयकावर आम आदमी पक्षाला(आप) पाठिंबा देणाऱ्या विरोधी खासदारांना अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहिले आहे. केजरीवाल यांनी एका पत्राद्वारे विरोधी आघाडी “इंडिया’च्या खासदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी विशेषत: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांचे आभार मानले.
केजरीवाल म्हणाले की, मी दिल्लीच्या 2 कोटी जनतेच्या वतीने तुमचे आभार मानतो. तुम्ही सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (जीएनसीटीडी) विधेयक 2023च्या विरोधात मतदान केले आहे. संसदेच्या अधिकारांसाठी आणि दिल्लीबाहेर वकिली केल्याबद्दल तुम्ही कौतुकास पात्र आहात. तुमचा संविधानावरील अढळ विश्वास अनेक दशके स्मरणात राहील याची मला खात्री आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्या शक्तींविरुद्धच्या लढ्यात मी तुमच्या सतत सहकार्याची अपेक्षा करतो.
केजरीवाल यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नितीश कुमार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, शरद पवार, एमके स्टॅलिन, हेमंत सोरेन आणि विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांना पत्रे लिहिली आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विशेष आभार
या विधेयकाचा विरोध करण्यासाठी व मतदानासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही कॉंग्रेसच्या वतीने सभागृहात पोहोचले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते व्हीलचेअरवर बसून आले होते. त्यामुळे केजरीवालांनी त्यांचेही पत्र लिहून आभार मानले आहेत. तुमची तब्येत आणि वय जास्त असूनही तुम्ही राज्यसभेत पोहोचलात, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. तुमची उपस्थिती संघीय संरचना आणि लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी शांतता आणि दृढनिश्चयाची प्रेरणा आहे, असे ते म्हणाले.