बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले. ‘कुछ कुछ होता है’ हा त्याचा चित्रपट सुपरहिट ठरला. यामुळे त्याला सिनेक्षेत्रात एक नवी ओळख मिळाली. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. नुकतेच करणला सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त ब्रिटिश संसदेकडून त्याला विशेष सन्मान देण्यात आला. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लंडनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये करणला सन्मानित करण्यात आले आहे. करणने त्याच्या अनेक सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी’ या सिनेमांचा लंडनमध्ये शूटिंग झाले आहे. 20 जून 2023 हा दिवस करणसाठी खूपच खास ठरला. यादिवशी त्याला सिनेसृष्टीतील योगदानासाठी ब्रिटिश संसदेकडून सन्मानित करण्यात आले आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करणने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात पुरस्कार असल्याचे दिसते. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करणने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आजचा दिवस खूप खास होता! लिसेस्टरच्या आदरणीय बॅरोनेस वर्मा यांच्या हस्ते लंडनमधील ब्रिटिश संसदेच्या सभागृहात सन्मानित झाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे. चित्रपट निर्माता म्हणून माझे २५ वे वर्ष साजरे केले आणि मी रॉकी और रानी की प्रेम कहानीचा टीझर देखील लाँच केला! हा त्या दिवसांपैकी एक आहे जिथे मी स्वतःला चिमटा काढतो आणि मला जाणवते की स्वप्ने सत्यात उतरतात. माझ्या प्रवासात तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या निस्सीम प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. आणि मी तुम्हाला वचन देतो, अजून बरेच काही आहे!’
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यानंतर शाहरुखनं ट्वीट करत करणचे कौतुक केले होते. त्याने लिहिले होते की, ‘ WOW करण, फिल्ममेकर म्हणून तू गेली 25 वर्षे काम करत आहे. तुझे वडील आणि माझे मित्र टॉम अंकल हे स्वर्गातून पाहत असतील आणि त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटत असेल. मी तुला नेहमी सांगितलं आहे की, अधिकाधिक चित्रपट तयार करत राहा कारण आपल्याला प्रेमाची जादू हवी आहे. जी फक्त तुच करू शकतो. रॉकी और रानी की प्रेम कहानीचा टीझर खूप छान आहे. चित्रपटाच्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा’
दरम्यान, करणचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. त्याचा हा सिनेमा भारतासह लंडनमध्ये देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. याशिवाय करणचा ‘कॉफी विथ करण’चा आगामी सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.