कराड – पुण्याच्या खडकवासला परिसरातील बिबट्याच्या शिकार प्रकरणी पुणे वन विभागाने सोमवारी हजारमाची (ता. कराड) येथे टाकलेल्या छाप्यामध्ये बिबट्याच्या कातड्यासह गवा, भेकर आणि हरणांच्या शिंगांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. भांबुर्डा (पुणे) वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अभिजित जाधव व विश्वजित जाधव यांच्या घरावर छापा टाकल्याचे वनअधिकारी जाधव यांनी सांगितले. त्यांच्या घरी मिळालेल्या वन्यजीवांचे अवयव प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव पुण्यातील खडकवासला धरणालगतच्या मांडवी बुद्रुक येथील फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
मांडवी खुर्दला उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने फार्महाऊसवर छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजे जप्त केले होते.
त्याप्रकरणी विश्वजित जाधव आणि अभिजित जाधव (दोघेही सध्या रा. डेक्कन जिमखाना, मूळ गाव हजारमाची, ता. कराड) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे मूळ गाव कराड तालुक्यातील हजारमाची असल्यामुळे पुण्याचे वनाधिकारी सपकाळ हे सातजणांच्या पथकासह येथे आले.
त्यांनी त्यांच्या घरात छापा टाकला असता त्यांना अनेक संशयास्पद गोष्टी हाती लागल्या आहेत. त्यातच बिबट्याच्या कातड्यासह गवा, हरण व भेकराची शिंगेही सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, एका महिलेने जाधव यांच्याकडे बिबट्याचे कातडे असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यासह वन विभागाकडेही तक्रार करण्यात आली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.