सातारा – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची नूतन इमारत करोना रुग्णांवरील उपचारासाठी जम्बो हॉस्पिटलमध्ये परावर्तित करण्यात आली होती. हे हॉस्पिटल बंद होऊन सात महिने उलटले असले, तरी हॉस्पिटलचे सहा लाख 37 हजार रुपयांचे वीज बिल अद्याप प्रलंबित आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या “लेट लतिफ’ कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने हा प्रश्न खोळंबला आहे.
शहरातील हजेरी माळावर 2009 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नूतन इमारतीचे काम सुरू झाले. दोन वेळा प्रशासकीय मान्यता मिळालेली ही इमारत पूर्ण झाल्यावरही पडून होती. 2020 मध्ये करोनाची पहिली लाट जिल्ह्यात आली. तेव्हा जिल्ह्यातील करोना रुग्णांवरील उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत ही इमारत ताब्यात घेऊन, तेथे जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू केले. तेथे दोन वर्षे हजारो करोनाबाधितांवर उपचार करण्यात आले. करोनाचा संसर्ग दर कमी झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 2021 पासून जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्यात आले, तरी ही इमारत अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलेली नाही.
या जम्बो हॉस्पिटलला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने तीन ठिकाणी पॉवर मीटर दिले होते. या हॉस्पिटलचे सहा लाख 37 हजार रुपयांचे वीज बिल जिल्हा प्रशासनाने अद्याप भरलेले नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शिफारस करून या बिलांसाठी पैशांची तरतूद करून घेणे आवश्यक होते; परंतु रुग्णालय समितीवर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने डॉ. चव्हाण यांनी हा प्रश्न सिंह यांच्यावर सोडून दिला. डॉ. चव्हाण यांनी केवळ कागदोपत्री पाठपुरावा करण्यात धन्यता मानली.
तब्बल आठ महिने वीज बिल प्रलंबित असल्याने महावितरणसच्या “मार्च एंड’च्या मोहिमेत जम्बो हॉस्पिटलची इमारत सील करायची नामुष्की ओढवली होती. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रक शेखर ताह्माणे व डॉ. सुभाष चव्हाण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप आहे. संग्रहालयाच्या इमारतीचा ताबा पुरातत्त्व विभागाकडे न आल्याने तेथील उर्वरित कामांसाठी मंजूर असलेली निविदा प्रक्रिया खोळंबली आहे. या कामाच्या वार्षिक दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केली आहे.