नवी दिल्ली -निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारावरील बहुतांश निर्बंध उठवले. त्यामुळे उत्तरप्रदेश आणि मणिपूरमध्ये पूर्ण क्षमतेने प्रचार करणे शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने मागील महिन्यात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.
त्यावेळी करोना संकट विचारात घेऊन प्रचारावर विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले. करोना संकट ओसरू लागल्याने ते निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. आता आयोगाने सभा, मेळावे निम्म्या क्षमतेने घेण्याची मर्यादा हटवली आहे. त्याशिवाय, जिल्हा प्रशासनाच्या पूर्व परवानगीने रोड शो आयोजित करण्यालाही मुभा दिली आहे. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमधील मतदानाची प्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे. आता उत्तरप्रदेशातील सातपैकी अखेरच्या तीन आणि मणिपूरमधील दोन्ही टप्प्यांसाठीचा प्रचार सुरू आहे.