इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशिद अहमद यांचा देखील उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. शेख रशिद अहमद हे आवामी मुस्लिम लीग पक्षाचे प्रमुख आहेत.
मुरी वन विभागाच्या विश्रामगृहाचे थकित भाडे न भरल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. हे भाडे न भरले जाणे हे उमेदवारी अर्ज फेटाळण्यामागील एक मुख्य कारण असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेख रशिद अहमद हे गेल्या वर्षी ४ सप्टेंबरपासून ८ सप्टंबेरपर्यंत या विश्रामगृहामध्ये मुक्कामाला होते. या विश्रामगृहाचे ३ लाख २२ हजार पाकिस्तानी रुपयांचे भाडे न देताच ते तेथून निघून गेले होते.
शेख रशिद अहमद यांच्यासह पाकिस्तानातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने छाननीनंतर फेटाळले आहेत. अर्ज फेटाळण्यात आलेल्या नेत्यांपैकी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश आहे.
तर अनेक कायदेशीर खटल्यांमधून निर्दोष सुटलेले नवाझ शरीफ यांचा उमेदवारी अर्ज मात्र मंजूर करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली आणि चार प्रांतीय असेंब्लीच्या ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी २२,७११ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत..