जेरुसलेम – इस्रायलच्या अध्यक्षपदी इसाक हर्रझोग यांची निवड झाली आहे. ज्येष्ठ राजकारणी असलेले इसाक यांचे कुटुंबही त्या देशातील जुने राजकीय घराणे म्हणून ओळखले जाते. 120 सदस्यांच्या संसदेने त्यांची आज एकमताने या पदी निवड केली.
अन्य देशांप्रमाणेच इस्रायलमध्येही राष्ट्राध्यक्षपद हे बहुतांशी शोभेचे पद मानले जाते, या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला देशाच्या सत्ताकारणात फार मर्यादित अधिकार आहेत.
60 वर्षीय इसाक हे इस्रायलच्या लेबर पार्टीचे माजी अध्यक्ष आहेत. सन 2013 च्या निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात अयशस्वी लढत दिली होती. विद्यमान अध्यक्ष रौवेन रिव्हलीन हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी ही नवीन निवड करण्यात आली आहे.
इसाक यांचे वडील अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत म्हणून काम पाहात होते. त्यांचे काकाही इस्रायलचे पहिले विदेश मंत्री राहिले आहेत. त्यांनीही अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. संसदीय राजकारणातून बाजूला झाल्यानंतर इसाक यांनी इस्रायलच्या इमिग्रेशन सिस्टिमसाठी सेवाभावी वृत्तीने काम केले आहे.
राष्ट्राध्यक्षपद हे तेथील शोभेचे पद असले तरी त्या देशात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता असल्याने त्यांच्यावरील जबाबदारी मोठी आहे. इस्रायलमध्ये गेल्या दोन वर्षात चार वेळा राष्ट्रीय निवडणुका घ्याव्या लागल्या आहेत. आजही नेतान्याहू हे आपली सत्ता टिकवण्यास अपयशी ठरले तर पुन्हा एकदा त्या देशात निवडणुक घ्यावी लागणार आहे.