नवी दिल्ली – पी- नोट्सच्या म्हणजे पार्टीसिपेटरी नोट्सच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असून ऑगस्टअखेर या माध्यमातून झालेली गुंतवणूक 97, 744 कोटी रुपयांवर गेली आहे.
आगामी काळातही गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात नोंदणी न करता पी नोटस्च्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. या संदर्भात रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक दीपक सिंग यांनी सांगितले की, भारतातील गुंतवणूकविषयक वातावरण सकारात्मक होत असल्याने परदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करीत आहेत.
आता खासगी कंपन्या भांडवली गुंतवणूक करणार आहेत. त्याचबरोबर पहिल्या दोन तिमाहीमध्ये कंपनीचे नफे चांगले आहेत. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार उत्सुक असल्याचे दिसून येते. अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक असलेले फेडरल रिझर्व व्याजदरवाढीवर काय निर्णय घेते यावर ही गुंतवणूक अवलंबून राहणार आहे. जर व्याजदर वाढीचा निर्णय झाला तर या गुंतवणुकीवर थोडाफार परिणाम होऊ शकतो.