नवी दिल्ली – अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास तयार असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका धक्कादायक विधानात म्हटले आहे की, ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापतीपद स्वीकारण्यास तयार आहेत. ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा मतदान प्रक्रियेनंतर सध्याचे सभापती केविन मॅकार्थी यांना पहिल्यांदाच पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी मॅकहेन्री यांची प्रोटेम अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
केवळ 269 दिवस सेवा दिल्यानंतर मॅककार्थी यांना सभापतीपदावरुन काढून टाकल्यानंतर पुढील सभापती कोण होईल याबबात अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या फॉक्स न्यूजच्या एका प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, गरज पडल्यास सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे.
फॉक्स न्यूज डिजिटलशी एका खास संभाषणात ट्रम्प म्हणाले की, यूएस कॉंग्रेसमध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत, त्यामुळे त्यांना ‘तात्पुरती’ सभापतीपदाची भूमिका बजावण्यास हरकत नाही. रिपब्लिकन सिनेटर्सना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. एकमत होईपर्यंत आणि अमेरिकन कॉंग्रेसच्या स्थायी स्पीकरची निवड होईपर्यंत ते पद घेऊ शकतात.
अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहात मेजॉरिटी व्हिपचे पद भूषविणाऱ्या स्टीव्ह स्कॅलिस यांनीही सभापती होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. स्टीव्ह हे लुईझियाना फॉरेस्टमधून निवडून आलेले रिपब्लिकन सिनेटर आहेत. त्यांच्याशिवाय हाऊस ज्युडिशियरी कमिटीचे अध्यक्ष जिम जॉर्डन यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. जॉर्डन हे ओहायोमधून निवडून आलेले रिपब्लिकन सिनेटर आहेत.