पुणे – पुणे-मुंबई मार्गावरील इंटरसिटी आणि मुंबई-चेन्नई दरम्यानची रेल्वे सेवा दि.1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊनमुळे नियमित सेवा स्थगित केली होती. या दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येत होत्या. मात्र, आता नियमित सेवा सुरू झाल्या असून, विविध मार्गांवरील स्थगित केलेल्या सेवा सुरू करण्यात येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पुणे इंटरसिटी दैनंदिन रेल्वे सकाळी 6.40 वाजता सुटणार असून, पुणे येथे 9.57 वाजता पोहोचेल. तर, पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी दैनंदिन रेल्वे सायंकाळी 5.55 वाजता सुटेल. ती मुंबई येथे 9.05 वाजता पोहोचणार आहे. दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजीनगर येथे रेल्वे थांबणार आहे.
यांसह पुणे स्थानकामार्गे धावणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई एग्मोर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद त्रि-साप्ताहिक सेवादेखील 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई येथून, तर दर गुरूवार, शनिवार आणि सोमवारी चेन्नई येथून रेल्वे सुटणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.