पुणे – मानीव अभिहस्तांतरणाच्या आदेशानुसार नोंदणीकृत दस्ताच्या आधारे सात- बारा उताऱ्यावर किंवा मिळकत पत्रिकेत नोंदणी करण्यासाठी गृहनिर्माण संस्था तलाठी अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज करतात. या प्रकरणात महसूल विभागातून फेरफार नोंद अभिलिखित व निर्गमित करण्यापूर्वी अशा मिळकतीमधील संबंधितांना पुन्हा नोटीस देण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी सांगितले.
मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत जिल्हास्तरीय समितीची सभा अतिरिक्त जिल्हाधिकारी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, नोंदणी विभागाचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे यांचसह पुणे शहरमधील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते.
यावेळी जिल्हा उपनिबंधक राऊत यांनी सांगितले की, शहरात सुमारे 19 हजार 500 नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी सुमारे 2 हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण किंवा विकसकाकडून हस्तांरण झालेले आहे.
याव्यतिरिक्तच्या सुमारे साडेसतरा हजार संस्थांमधील 40 टक्के संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे. उर्वरित संस्थांबाबत सहकार विभाग प्रयत्नशील आहे. सहकार बरोबरच मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमि अभिलेख विभागाचाही यात महत्त्वाची भूमिका असून समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे.
दस्त नोंदणी वेळेस मुद्रांक व नोंदणी विभागाकडून सदनिकेच्या खरेदी-विक्रीच्या दस्ताची चेंज ऑफ ऍग्रीमेंटच्या मागणीच्या अनुषंगाने सदनिकांचा मुद्रांक शुल्क भरणा करण्यात आला असेल अशा ठिकाणी शासन निर्णयानुसार कार्यवाही अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्याच्यादृष्टीने उपाययोजना सुरु केली असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल.
-संतोष हिंगाणे, मुद्रांक जिल्हाधिकारी