IND vs PAK Match : भारत-पाक सामना रद्द झाल्यास ४,५०० कोटींचे होणार नुकसान! कोणाला बसणार सर्वाधिक फटका? पाहा आकडेवारी
IND vs PAK Match : टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाला तर क्रिकेटच्या व्यावसायिक परिसंस्थेला ४,५०० कोटी रुपयांचा प्रचंड फटका बसणार आहे.

IND vs PAK match cancellation Financial loss : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत–पाकिस्तान सामना हा केवळ क्रिकेटचा सामना नसून तो एक महाकाय आर्थिक इव्हेंट आहे. या एका सामन्याची अंदाजे किंमत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) इतकी आहे. जर पाकिस्तान या आपल्या बहिष्काराच्या निर्णयवार ठाम राहिला, तर क्रिकेटच्या व्यावसायिक परिसंस्थेला (Commercial Ecosystem) ४,५०० कोटी रुपयांचा प्रचंड फटका बसणार आहे.
जाहिरातींतून मिळणाऱ्या ३०० कोटींवर पाणी –
एनडीटीव्हीच्या (NDTV) अहवालानुसार, या सामन्यातील सर्वाधिक कमाई टीव्ही आणि डिजिटल ब्रॉडकास्टिंगमधून येते.
जाहिरात शुल्क: या सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी २५ ते ४० लाख रुपये मोजावे लागतात.
नफा: केवळ जाहिरातींतून हा सामना ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळवून देतो.
तुलना: एका सरासरी वर्ल्ड कप सामन्यातून १३८ कोटी मिळतात, तर भारत-पाक सामन्यातून त्यापेक्षा दुप्पट महसूल मिळतो. सामना रद्द झाल्यास प्रसारकांचे (Broadcasters) सुमारे ३७० ते ४०० कोटी रुपयांचे थेट नुकसान होऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) कंबर मोडणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाल्याने आर्थिक नुकसान
हा सामना रद्द झाल्याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसण्याची शक्यता आहे.
१. निधीत कपात: आयसीसीकडून पीसीबीला दरवर्षी सुमारे ३४.५ दशलक्ष डॉलर्स (महसूल वाटप ५.७५%) मिळतात. प्रसारकांचे नुकसान भरून काढण्यासाठी आयसीसी पीसीबीच्या या हिश्यातील ७० ते ८० टक्के रक्कम कापून घेऊ शकते.
२. विमा कवच मिळणार नाही: स्वेच्छेने सामना सोडणे हे ‘फोर्स मेज्योर’ (Force Majeure) कलमात येत नाही. त्यामुळे पीसीबीला विम्याचे संरक्षण मिळणार नाही आणि त्यांना दंड तसेच कायदेशीर दाव्यांना सामोरे जावे लागेल.
लहान क्रिकेट बोर्डांना फटका –
बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया सारखे मोठे बोर्ड हे नुकसान सहन करू शकतात. मात्र, आयसीसीच्या निधीवर अवलंबून असलेल्या लहान देशांच्या क्रिकेट बोर्डांना महसूल कमी मिळाल्यामुळे मोठा फटका बसेल. भारत-पाकिस्तान सामना रद्द होणे हे केवळ दोन देशांमधील नुकसान नसून संपूर्ण जागतिक क्रिकेटसाठी तो एक मोठा ‘फायनान्शिअल शॉक’ ठरणार आहे.





