BCCI Rajeev Shukla : पाकिस्तानच्या ‘आडमुठेपणा’वर BCCIची पहिली प्रतिक्रिया! राजीव शुक्ला यांनी दिला थेट इशारा; पाहा काय म्हणाले?
BCCI Rajeev Shukla : बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणावर भाष्य करताना पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध केला आहे.

BCCI Rajeev Shukla reaction on Pakistan boycott : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणावर भाष्य करताना पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध केला असून, सध्या बीसीसीआय ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आयसीसीच्या भूमिकेशी बीसीसीआय सहमत –
राजीव शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आयसीसीने आपल्या निवेदनात ज्या खेळभावनेचा उल्लेख केला आहे, त्याच्याशी बीसीसीआय पूर्णपणे सहमत आहे. याप्रकरणी आयसीसीशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच बीसीसीआय आपली अधिकृत भूमिका मांडेल.” आयसीसी यावर काय अंतिम निर्णय घेते, त्यानंतरच भारत आपली पुढील चाल खेळणार असल्याचे शुक्ला यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
बहिष्काराचे ‘बांगलादेश’ कनेक्शन?
पाकिस्तानचा हा निर्णय बांगलादेश प्रकरणाशी जोडला जात आहे. सुरक्षा कारणास्तव भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने आधीच वर्ल्ड कपमधून बाहेर काढले आहे. बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचे बोलले जात आहे. मात्र, आयसीसीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही संघाची अशी ‘निवडक’ भूमिका सहन केली जाणार नाही.
T20 World Cup 2026: BCCI supports ICC’s stand on Pakistan boycott, says Rajeev Shukla#rajeevshukla #ICC #BCCI #t20Worldcup2026 #reels #PCB pic.twitter.com/3pqm5AqebD
— Sports Today (@SportsTodayofc) February 2, 2026
आयसीसीने पाकिस्तानला फटकारले –
पाकिस्तान सरकारच्या सोशल मीडिया पोस्टनंतर आयसीसीने कडक भाषेत आपली भूमिका मांडली आहे.
खेळभावनेला तडा: ठराविक संघाविरुद्ध खेळण्यास नकार देणे हे जागतिक स्पर्धांच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे.
पीसीबीला ताकीद: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अजूनही अधिकृत पत्राची प्रतीक्षा आहे.
वेळापत्रकाचे पालन अनिवार्य: प्रत्येक संघाला ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सामने खेळावे लागतील, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
हेही वाचा – Nishida Sliding Apology : चेंडू चुकून महिला जजला लागला अन् खेळाडूने जे केलं ते पाहून जग थक्क! जपानी संस्कृतीचं जगभर कौतुक
पाकिस्तानचे मोठे नुकसान होण्याची शक्यता –
जर पाकिस्तानने १५ फेब्रुवारीचा कोलंबोतील सामना खेळला नाही, तर आयसीसी त्यांच्यावर मोठी आर्थिक दंडात्मक कारवाई किंवा आगामी स्पर्धांतून निलंबनाची कारवाई करू शकते. यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे जागतिक स्तरावर मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





