BCCI Performance Review : बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये! सलग दोन मालिकेतील मानहानिकारक पराभवानंतर कॅप्टन-कोचसह खेळाडूंचे होणार मोजमाप
BCCI Performance Review : आता बीसीसीआय कडक पावले उचलण्याच्या तयारीत असून बोर्डाकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे.

BCCI Performance Review On Iyer Captaincy Gambhir Coach Job IND vs ENG T20I Series 2026 : श्रेयस अय्यरकडे जेव्हा भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले, तेव्हा त्याच्या नेतृत्वाची सुरुवात इतकी लाजिरवाणी होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. अय्यरच्या कप्तानीखाली टीम इंडियाला प्रथम आयर्लंडविरुद्ध आणि आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सलग दोन मालिकांमधील पराभवामुळे केवळ संघाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही, तर भारताचे जागतिक क्रमवारीतील नंबर-१ चे स्थानही धोक्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धचा आगामी शेवटचा सामना गमावल्यास भारताला नंबर-१ चा मुकुट गमवावा लागेल. या पार्श्वभूमीवर, आता बीसीसीआय कडक पावले उचलण्याच्या तयारीत असून बोर्डाकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे.
कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंच्या कामगिरीचे होणार मोजमाप –
🚨 Reports 🚨
BCCI to review the performances of players and coaching staff following India’s T20I series defeat to England. Reports also suggest that head coach Gautam Gambhir’s position could come under scrutiny.
(Source: Vipul Kashyap/ANI)#TeamIndia #GautamGambhir #BCCI… pic.twitter.com/1NmTxOmu4H
— Sportskeeda (@Sportskeeda) July 10, 2026
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सलग दोन विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील एकमेव संघ आहे. अशा विश्वविजेत्या संघाची अवस्था पाहून बीसीसीआयचे धाबे दणाणले आहेत. वृत्तसंस्था ‘एएनआय’शी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, “बोर्ड या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत असून, लवकरच खेळाडूंसह संपूर्ण कोचिंग स्टाफच्या कामगिरीचे पुनरावलोकन (आकलन) करणार आहे.” सध्याच्या मुख्य प्रशिक्षकांचा करार २०२७ पर्यंत असला, तरी या लाजिरवाण्या कामगिरीमुळे आता त्यांच्या पदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सूर्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय पडला महागात –
टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे विजेतेपद सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पटकावले होते. सूर्याच्या कप्तानीमध्ये संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, फलंदाज म्हणून सूर्या खराब फॉर्ममधून जात असल्याने भविष्यकालीन नियोजनाचा विचार करून बीसीसीआयने त्याला थेट संघातून ड्रॉप केले आणि श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवले. बोर्डाचा हाच निर्णय आता पूर्णपणे अंगलट आला आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत भारताला पराभवाचा धक्का बसला असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या आकडेवारीमुळे निवडकर्ते आणि श्रेयस अय्यर दोघांवरही कडाडून टीका होत आहे.





