IND vs AUS : BCCI चा मोठा निर्णय; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ जाहीर, कर्णधारपदी रोहितच्या जागी गिलला संधी

IND vs AUS India’s ODI squad announced for Australia tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यासह क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षेत असलेली मोठी बातमीही समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यांनंतर भारतीय वनडे संघात परतले आहेत. मात्र, यापेक्षा मोठी घोषणा म्हणजे वनडे स्वरूपात कर्णधारपदात बदल करण्यात आला आहे.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा यापुढे वनडे संघाचे नेतृत्व करणार नाही. त्याच्या जागी भारताचा स्टार सलामीवीर आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलला वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधार पदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
शुबमन गिलची वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड –
🚨 India’s squad for Tour of Australia announced
Shubman Gill named #TeamIndia Captain for ODIs
The #AUSvIND bilateral series comprises three ODIs and five T20Is against Australia in October-November pic.twitter.com/l3I2LA1dBJ
— BCCI (@BCCI) October 4, 2025
१९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीची बैठक शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीत खेळाडूंच्या निवडीबरोबरच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कर्णधारपदाबाबतही निर्णय घेण्यात आला. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने शुबमन गिल याला वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.
इंग्लंड दौऱ्यावरील गिलचे नेतृत्व कौशल्य, फलंदाजीतील उत्कृष्ट कामगिरी आणि वनडे स्वरूपात त्याची निश्चित जागा यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान गिलला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतरच रोहित शर्माच्या जागी तो कर्णधार होऊ शकतो, असे अंदाज वर्तवले जात होते. इंग्लंड दौऱ्याने त्यांच्या दावेदारीला आणखी बळ मिळाले.
या दौऱ्यात गिलला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि त्याने मालिका २-२ अशी बरोबरीत राखली. यासह त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळताना ७५४ धावांची विक्रमी प्रदर्शन करत सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. या कामगिरीमुळे निवडकर्ते आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वनडे स्वरूपासाठीही गिल याच्यावर विश्वास दाखवला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.





