Karsan Ghavri : ‘तुम्ही असाल विराट कोहली किंवा रोहित शर्मा, पण…’, गावस्करांच्या अपमानावरुन माजी खेळाडू संतापला

Karsan Ghavri slam Virat Rohit : भारतीय क्रिकेट संघातील सध्याच्या खेळाडूंना दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा आदर करायला हवा, असे मत माजी जलदगती गोलंदाज करसन घावरी यांनी व्यक्त केले आहे. विकी लालवानीच्या शोमध्ये बोलताना घावरी यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंनी गावस्कर यांच्या टीकेचा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करावा, असे सांगितले.
सुनील गावस्कर यांच्या टीका आणि सल्ल्यांचा खेळाडूंना फायदा होऊ शकतो, परंतु दुर्दैवाने भारतीय खेळाडू त्यांच्याकडून सल्ला घेत नाहीत, याबद्दल करसन घावरी यांनी खंत व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, रोहित शर्माने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेदरम्यान गावस्कर यांच्या टीकेसंदर्भात बीसीसीआयकडे तक्रार केली होती. तसेच, आयपीएल 2024 मध्ये गावस्कर यांनी विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने कोहली आणि गावस्कर यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
‘तुम्ही असाल रोहित शर्मा किंवा विराट कोहली, पण…’
75 वर्षीय घावरी, जे गावस्कर यांच्यासोबत खेळले आहे, ते म्हणाले, “तुम्ही असाल रोहित शर्मा किंवा विराट कोहली तरीही, दिग्गज खेळाडूचा आदर करायलाच हवा. गावस्कर जेव्हा काही सांगतात किंवा सल्ला देतात, तेव्हा ते खेळाडूंच्या हितासाठीच असते. रवी शास्त्री आणि गावस्कर यांच्या टीकेच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. गावस्कर गेली 25 वर्षे समालोचन करत आहेत आणि त्यांचे मत युवा खेळाडूंसाठी अमूल्य आहे.”
हेही वाचा – Irfan Pathan : धोनीमुळं माझं करिअर संपलं…? इरफान पठाणचा धक्कादायक खुलासा; जाणून घ्या काय म्हणाला?
‘हे दुर्दैवी आहे’ –
घावरी पुढे म्हणाले, “परदेशी खेळाडू गावस्कर यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी येतात, पण आपले खेळाडू तसे करत नाहीत, हे दुर्दैवी आहे. कर्णधार शुबमन गिल यासह प्रत्येक भारतीय फलंदाजाने गावस्कर यांच्याकडे जाऊन सल्ला घ्यायला हवा. गावस्कर यांनी कोहली, रोहित किंवा गिल यांना सल्ला दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये यायला हव्यात, पण तशा बातम्या कधीच येत नाहीत.”
गावस्कर यांच्या टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळाडूंनी त्यांचा अनुभव आणि ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन घावरी यांनी केले आहे.





