Shubman Gill Jersey : शुबमन गिलने कसोटी विक्रमासह जर्सी लिलावातही मारली बाजी! तब्बल ‘इतकी’ लागली बोली

Shubman Gill jersey highest bid : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने 754 धावा काढून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार होण्याचा विक्रम केला. एजबॅस्टन कसोटीत त्याने 430 धावा काढून एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही मिळवला. तसेच मालिकाही बरोबरीत सोडवली. आता शुबमन गिलने मैदानाच्या बाहेरही बाजी मारली आहे.
मैदानाबाहेरही गिलने मारली बाजी –
रेड फॉर रूथ स्पेशल लिलावात खेळाडूंच्या जर्सी आणि टोपींचा लिलाव झाला, यात शुबमन गिलची जर्सी सर्वात महाग विकली गेली. त्याच्या जर्सीला 4600 ब्रिटिश पाउंड (सुमारे 5.5 लाख रुपये) मिळाले. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्या जर्सीला प्रत्येकी 4200 पाउंड (4.94 लाख रुपये), ऋषभ पंतच्या जर्सीला 3400 पाउंड (4 लाख रुपये) आणि केएल राहुलच्या जर्सीला 4000 पाउंड (4.70 लाख रुपये) मिळाले. इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जो रूटची जर्सी 3800 पाउंड (4.47 लाख रुपये) आणि बेन स्टोक्सची जर्सीला 3400 पाउंड (4 लाख रुपये) मिळाले.
रेड फॉर रूथ अभियान म्हणजे काय?
रेड फॉर रूथ अभियान हे रूथ स्ट्रॉस फाउंडेशनने सुरू केलेला एक उपक्रम आहे. यामागचा उद्देश दुर्मीळ फुफ्फुसांच्या कर्करोगावर संशोधनासाठी निधी गोळा करणे आणि पालकांच्या मृत्यूचा सामना करणाऱ्या कुटुंबांना भावनिक व व्यावहारिक मदत करणे आहे. हे अभियान रूथ स्ट्रॉस यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आले, ज्यांचा 2018 मध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता.
हेही वाचा – DPL 2025 : प्रियांश आर्यचे ऐतिहासिक शतक, DPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील लॉर्ड्स कसोटीचा दुसरा दिवस रेड फॉर रूथ डे म्हणून साजरा करण्यात आला. या अभियानात खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रसारक आणि हजारो प्रेक्षक फाउंडेशनच्या मिशनला पाठिंबा दर्शवण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करतात.





