नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आघाडीच्या पशुखाद्य उत्पादकाशी संबंधित काही ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे घालून 52 लाख रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आज ही माहिती दिली.
कानपूर, गोरखपूर, नोएडा, दिल्ली आणि लुधियानामधील एकूण 16 ठिकाणच्या छाप्यांची ही कारावाई 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण 121 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड करण्यात आली.
“आतापर्यंत 52 लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले आहेत. उर्वरित दागदागिन्यांच्या स्रोतांबाबत चौकशी केली जात आहे. तसेच या कारवाईदरम्यान सापडलेल्या 1.30 कोटी रुपयंच्या रोख रकमेच्या स्रोतांबाबतही चौकशी केली जात आहे. छाप्यांदरम्यान बॅंकांमधील 7 लॉकरही सापडले असून त्याची तपासणी अद्याप होणे बाकी आहे.’ असे “सीबीडीटी’च्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित पशुखाद्य उत्पादक समूहाने दिल्लीस्थित बनावट कंपन्यांच्या नावे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार दाखवून मोठ्या रकमेची कर्ज मिळवली असल्याचा प्रमुख आरोप आहे. या बनावट कंपन्यांचे संचालक प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. ज्यांची नावे संचालक म्हणून आहेत, त्यांचा या कंपन्यांशी काहीही संबंध नाही. त्यापैकी एक संचालक तर टॅक्सी चालक आहे.
मात्र त्याच्या नावावर 11 बॅंक खाती असून त्यावर मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत, असेही “सीबीडीटी’ने म्हटले आहे.