राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मतदारांच्या गाठीभेटी
शिनोली- आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा झंझावाती प्रचार आदिवासी भागात सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या आदिवासी महिला पदाधिकारी झटून कामाला लागल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वळसे-पाटील यांनाच मोठे मताधिक्य असणार आहे, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या रुपाली जगदाळे यांनी व्यक्त केला.
दिलीप वळसे पाटील यांना गेल्या 30 वर्षांपासून पश्चिम आदिवासी भागातील जनतेने भक्कम पाठिंबा देण्याचे काम केले आहे. वळसे पाटील यांनी देखील आदिवासी भागात विकासकामांसाठी झुकते माप दिले आहे. आदिवासी भागात रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज या मुलभूत सुविधा वळसे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागल्या आहेत. आदीवासी भागातील युवकांना तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी बॅंक, पराग दूध समूह अशा विविध संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळवून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत आदिवासी जनता वळसे पाटील यांच्या मागे भक्कमपणाने उभी राहते. मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले. आता आमदार दिलीप वळसे पाटील हे निवडणुकीत उभे आहेत. त्यांना अधिकचे मताधिक्य देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे.
सकाळपासूनच घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन वळसे पाटील यांच्या माध्यमातून परिसरात झालेला विकास समजावून सांगत आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती इंदुताई लोहकरे, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या सदस्या सुनीता बोऱ्हाडे, राजपूर गावच्या सरपंच कमल लोहकरे, युवती अध्यक्षा उर्मिला वाकचौरे, माजी सरपंच तानाजी राक्षे यांनी रविवारी (दि. 6) राजपूर परिसरात घरोघरी जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे यांनाच भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन जगदाळे यांनी केले.