कराड (प्रतिनिधी) – येथील वाखाण परिसरात अंडरग्राउंड ड्रेनेज पाइपलाइनची साफसफाई करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरून ते बेशुद्ध पडल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी तात्काळ कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान यातील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण अजूनही बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अनिरूध्द लाड असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर धनाजी चंदनशिवे यामध्ये बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दि. 14 रोजी कराड पालिका हद्दीतील वाखाण परिसरात अंडरग्राउंड ड्रेनेज पाईपलाईनच्या साफसफाईचे काम सुरु होते. पालिकेचे काही स्वच्छता कर्मचारी हे काम करत असताना त्यातील दोघेजण गुदमरल्याने बेशुद्ध पडले. ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी याबाबत तात्काळ पालिका प्रशासनास संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यांनतर तात्काळ अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी रमाकांत डाके व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोघांना बाहेर काढले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याठिकाणी उपचार सुरु असताना उपचारादरम्यान अनिरूध्द लाड यांचा मृत्यू झाला. धनाजी चंदनशिवे अजूनही बेशुद्ध अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच प्रवीण चव्हाण, जयवंत लाड हेही त्याठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनच्या साफसफाईचे काम करीत होते. ते सुखरूप आहेत.