इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारच्या कारभाराबद्दल माजी पंतप्रदान इम्रान खान हे श्वेतपत्रिका काढणार आहेत. गेल्या तीन वर्षींच्या कालावधीतील देशाच्या आर्थिक स्थितीबाबतची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका आपण मांडणार असल्याचे इम्रान खान यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या श्वेतपत्रिकेतील वस्तुस्थितीची तुलना आपल्या कालावधीतील स्थितीबरोबर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’च्या कालावधीमध्ये देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ पक्षाचे सरकार पायउतार झाले. इम्रान खान यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेंव्हापासून इम्रान खान शेहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका करत आहेत. आपण इस्लामी विद्वान नाही. मात्र आपण सर्व काही आपल्या अनुभवातूनच शिकलो आहोत. प्रेषितांच्या प्रेरणेतून झालेल्या क्रांतीसारखी क्रांती जगभरातील अन्य कोणत्याही देशामध्ये झाली नाही. फक्त मुक्त लोक, गुलाम नाहीत, स्वातंत्र्यासाठी उभे आहेत, बद्रची लढाई आणि खालिद बिन वलीदचे नेतृत्व हे त्याचे पुरावे आहेत. असे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या विरोधात देशद्रोहासारखे खटले दाखल करून देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन केली जात आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने पंजाब प्रांताच्या निवडणुकांबाबत दिलेला निर्णय मान्य न करणारा ठराव केल्यामुळे पाकिस्तानातील प्रजासत्ताक स्थितीबाबत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जातो आहे. पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक पुढे येणार नाहीत, अशी शक्यताही इम्रान खान यांनी व्यक्त केली.