मंचर- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे दोन ठिकाणी मंचर पोलिसांनी छापा टाकून एकूण 3 हजार 280 रुपयांचा बेकायदा दारुसाठा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. 22) मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना अवसरी बुद्रुक परिसरात बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस जवान नवनाथ नाईकडे,पी. एस. भुजबळ हे कारवाई करण्यासाठी गेले. अवसरी बुद्रुक-हिंगेमळा ते पहाडदरा दरम्यान रस्त्यालगत मेंगडेवाडी खिंडीजवळ कनॉललगत मनेश बाळासाहेब चौगुले (रा. अवसरी बुद्रुक) हा बगरपरवाना 1 हजार 40 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या विकताना दिसला. मात्र, पोलिसांची चाहुल लागताच तो पळून गेला. या ठिकाणी असलेला दारूसाठा मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला मनेश चौगुले यांच्या विरोधात पोलीस जवान पी. एस. भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलीस जवान नवनाथ नाईकडे करीत आहेत.
याबरोबरच अवसरी बुद्रुक गावाच्या हद्दीतीलच एका हॉटेलमागे संजीत मनोरंजन कोटाल (वय 36, रा. केंदूर गावठाण, ता.शिरूर) याच्याजवळ विनापरवाना 2 हजार 840 रुपयांचा दारूसाठा आढळून आला. मंचर पोलिसांनी दारूसाठा जप्त केला आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान सुदर्शन माताडे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान एस. बी. गिलबिले करीत आहेत.