नवी दिल्ली – जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वांच्याच मनात कोरोनावरील लस कधी येणार? असा प्रश्न घोंघावतोय. गेल्या काही दिवसांपासून लस संशोधना -बाबत समोर आलेल्या सकारात्मक वृत्तांमुळे कोरोना लसीची प्रतीक्षा वर्षाखेरपर्यंत संपणार अशी आशा निर्माण झाली होती. मात्र आता याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेला अंदाज या आशेवर विर्जन पाडणारा ठरला आहे.
आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी याबाबतचा दावा केला आहे. ते म्हणतात, ‘कोरोनाची लस इतक्यात लोकांपर्यंत पोहचेल असं वाटत नाही. २०२१च्या सुरुवातीला प्रत्यक्षात लोकांना कोरोना लसीचे डोस द्यायला सुरुवात होईल असा अंदाज आहे.’
‘असं असलं तरी, कोरोना लसीबाबत आतापर्यंत झालेली प्रगती आश्वासक आहे. २०२१च्या पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात होईल. मात्र तोपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे.’ असं देखील रायन यांनी स्पष्ट केलं.
सध्या विविध देश कोरोना लसीचे डोस आरक्षित करताना दिसतायेत.अमेरिकेने याबाबत फायझर आणि बायोटेक एसई या कोरोना लस निर्मिती करत असलेल्या कंपन्यांसोबत १.९५ बिलियन डॉलर्सचा करार केला असून १० कोटी लसींचे डोस स्वतःसाठी राखून ठेवलेत. ब्रिटनने देखील ९ कोटी डोससाठी करार केला आहे.