हिंगोली – सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात पती-पत्नीने एकाच झाडाला अन् एकाच दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
रामदास बाळू इंगळे (24) व शितल रामदास इंगळे (22) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. रामदास इंगळे यांनी दाताडा बुद्रुक शिवारात शेत घेतले होते. त्यामुळे ते आखाड्यावरच राहात होते. रामदास यांचा विवाह विदर्भातील मडी या गावातील शितल यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी झाला होता. तर सहा महिन्यांपूर्वीच रामदास यांचे वडिल बाळू इंगळे यांचे निधन झाले होते.
तीन महिन्यांपूर्वी शितल इंगळे या माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे शेतातील आखाड्यावर रामदास इंगळे व त्यांची आई सरस्वती इंगळे हे दोघेच राहात होते. दोन दिवसांपूर्वी रामदासदेखील मडी येथे गेले होते. त्यानंतर ते आखाड्यावर आलेच नाही.
त्यानंतर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दाताडा बुद्रुक शिवारात एका झाडाला दोन मृतदेह लटकल्याचे दिसून आले. हा प्रकार समजताच गावकरी घटनास्थळी जमा झाले. तसेच सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वाघजाळी येथील काही गावकऱ्यांनी सदर मृतदेह रामदास इंगळे व त्यांची पत्नी शितल इंगळे यांचा असल्याचे सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.