नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी लिटरमागे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 35 आणि 26 पैशांची वाढ केली. त्यामुळे उत्तरप्रदेश, छत्तिसगढ आणि नागालॅंड या आणखी 3 राज्यांत पेट्रोल दराने शंभरी ओलांडली. आता तो टप्पा ओलांडणाऱ्या देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 19 इतकी झाली आहे.
सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवसांच्या विश्रामानंतर 4 मे यादिवशी सर्वप्रथम दरवाढ केली. तेव्हापासून इंधन दरवाढीचे सत्रच सुरू झाले आहे. मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 38 वेळा, तर डिझेलच्या दरात 36 वेळा वाढ झाली.
त्या दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल 10 रूपये 51 पैशांनी, तर डिझेल 9 रूपये 15 पैशांनी महागले. राजस्थान, ओडिशा आणि मध्यप्रदेश या 3 राज्यांत तर देशात सर्वांधिक वापर होणारे इंधन असणाऱ्या डिझेलच्या दरानेही शंभरची पातळी ओलांडली आहे.
गगनाला भिडलेल्या इंधन दरांमुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बहुतांश विरोधी पक्ष देशभरात निदर्शने करत आहेत.