पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या रावेत बंधाऱ्यानजीक पवना नदीच्या पात्रात शेकडो मृत मासे तरंगताना आढळले. ही माहिती मिळताच महापौर माई ढोरे यांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणी केली.
पवनानदी पात्रात सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
बुधवारी (दि.4) सकाळी रावेत बंधारा येथे भोंडवे लॉन्स जवळ मृथ मासे पवना नदीपात्रात तरंगत होते. ही माहिती महापौरांना समजली. स्थानिक रहिवाशांनी महापौरांना फोन करुन ही माहिती दिली. महापौरांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी शेकडो लहान मोठे मासे मृत अवस्थेत नदीपात्रात तरंगताना आढळले. कोणतीही प्रक्रिया न करता कंपन्यांचे अशुद्ध सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे यावेळी पाहणीत समोर आले. या कंपन्यांमुळे नदीचे प्रदूषण होत आहे. तसेच हे पाणी नागरिकांच्या जीवितालादेखील धोकादायक आहे. त्यामुळे त्वरीत या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली.
रावेत बंधारा येथून उपसा केलेले पाणी प्रक्रिया करुन नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते. मात्र या अशुद्ध पाण्यामुळे नदीतील जलचरांच्या जीवाला हानी होत आहे. त्यामुळे पर्यायाने नागरिकांना हा मोठा धोका आहे.