पिंपरी – पावसाचे पाणी वाचविल्यास उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई कमी करता येऊ शकते. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय उत्तम मानला जातो. आकुर्डी येथील रेल्वे स्थानकात
रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत स्थानकामध्ये आता प्रवाशांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे टँकर मागविण्याची गरज उरणार नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात भरपूर पाऊस पडूनही गेल्या दीड वर्षांपासून पाणीकपात सुरु आहे. यामुळे पावसाच्या पडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेत रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेत पावसाचे पाणी वाचवून ते पाणी जमिनीत खोल खड्डा करून सोडले जाते. जमिनीत सोडलेल्या याच पाण्याचा वापर बोअरवेलद्वारे केला जातो.
आकुर्डी रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक रतन रजक यांनी याबाबत पुढाकार घेऊन स्थानकामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविली आहे. 10 हजार लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे. रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या छतावर साचणारे पावसाचे पाणी जमवून त्याचा वापर रेल्वे स्थानकावर केला जाणार आहे. तसेच स्थानकालगत लावलेल्या झाडांसाठी देखील हे पाणी वापरता येणार आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानकात सध्या उन्हाळ्याच्या कालावधीत दर महिन्याला 6 ते 7 पाण्याचे टँकर मागवावे लागतात. त्याशिवाय, कधी-कधी महापालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था तयार झाली आहे.
“आकुर्डी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या छतावर साचणारे पावसाचे पाणी
आम्ही सध्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाकडे वळविले आहे. पुढील वर्षी फलाटावर साचणारे पाणी देखील या प्रकल्पात वळविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. अन्य रेल्वे स्थानकांवर देखील हा उपक्रम राबविला गेल्यास पर्यावरण संरक्षणाबरोबरच
पाण्याची बचत देखील होईल.”, आकुर्डी रेल्वे स्थानकचे स्टेशन प्रबंधक रतन रजक यांनी सांगितले.
– , ,