Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत्या 20 जानेवारीपासून कूच करणार आहे.त्यावेळेसच्या आंदोलनासाठी जरांगे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरु केले आहे.
आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती जरांगे यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत मनोज जरांगे याबद्दल माहिती दिली आहे, ’20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे.प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत एक लाख असो की एक कोटी असो, ते पाहिले जाईल. असं जरांगे यावेळी म्हणाले.
रोज पायी बारावाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्काम करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला वेळ द्यायचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. बीड वरून निघाल्यावर जरांगे कोणत्या कोणत्या ठिकाणी थांबणार आहेत याबाबतची माहिती देखील समोर आली आहे.ज्यामध्ये जरांगे पुण्यात दोन दिवस थांबणार असल्याचे समजते. पुण्याच्या ग्रामीण भागातील रांजणगाव गणपती आणि खराडी बायपास या ठिकाणी जरांगे यांचा मुक्काम असणार आहे.
पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा अकाडा एक करोडो होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहोत. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहेत. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या अशा अनेक सूचना जरांगे यांनी यावेळी दिल्या.
असा असणार मार्ग
20 जानेवारी पहिला मुक्काम – बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम – (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 वा मुक्काम – आझाद मैदान आंदोलन स्थळी