- खासगी डॉक्टरांना रुग्णसेवा सुरू ठेवण्याचे आवाहन
पिंपरी – गेल्या दोन महिन्यांपासून शहरात करोनाने धुमाकूळ घातलेला असताना आता पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना जाग आली आहे. आमदार बनसोडे यांचे हे आवाहन म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालये सुरू असतानाही माहिती न घेताच खासगी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मार्च महिन्यापासून आतापर्यंत अनेक डॉक्टरांसह नर्स व वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या अनेकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बनसोडे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने मास्क वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत खासगी डॉक्टरांना सेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. विशेष बाब म्हणजे शहरातील बहुतांश खासगी रुग्णालये सुरू आहेत. एप्रिल महिन्यात काही डॉक्टरांनी आपली सेवा बंद केली होती. त्यावेळी मात्र बनसोडे यांनी कोणतेही आवाहन केले नव्हते.
महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर बनसोडे यांचे कार्यालय असताना त्यांनी आतापर्यंत महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजना अथवा पालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट खरेदीबाबत चकार शब्द काढलेला नाही. मधल्या कालावधीत काही प्रमाणात पत्रकबाजी करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला होता.
ठेकेदारांसाठी हालचाली
महापालिकेत भाजपाची सत्ता असतानाही आपल्या काही समर्थकांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार बनसोडे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाईचा विषय असो अथवा महिलांच्या प्रशिक्षणाचा विषय यामध्ये समर्थकांना ठेके मिळवून देण्यात मात्र त्यांनी चालविलेल्या प्रयत्नांची चर्चा पलिका वर्तुळात सुरू आहे.