वाघोली – पुणे महानगरपालिकेत असणाऱ्या होर्डिंग चालक-मालकांचे प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुण्यातील बैठकीत होर्डिंग चालक-मालकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. याबाबतीत या होर्डिंग व्यवसायाशी निगडित असणाऱ्या पंचवीस हजार कुटुंबांना दिलासा देण्यात येणार असून पुणे महानगरपालिकेला होर्डिंगसाठीचा टॅक्स आकारणी बाबतचा योग्य तो निर्णय घेऊन होर्डिंग चालक मालकांचे प्रश्न सोडणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी होर्डिंग चालक-मालकांच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या निर्णयाचे व मनोगताची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुणे महानगरपालिकेत पूर्वी समाविष्ट झालेली 11 गावे व नव्याने समाविष्ट झालेली 23 गावे तसेच पुणे महानगरपालिकेत यापूर्वी सुरू असणारे होर्डिंग व्यवसाय याबाबत टॅक्स आकारणी संदर्भात अनेक होर्डिंग चालक-मालक उच्च न्यायालयात देखील गेले असून त्याहीठिकाणी ते दाद मागत आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील निवेदने देण्यात आली आहेत.
“होर्डिंग चालक-मालकांचे पुणे महानगरपालिका हद्दीत असणारा भाग, पूर्वी समाविष्ट झालेली 11 गावे, नव्याने समाविष्ट झालेली 23 गावे या वर्गीकरणानुसार योग्य ती माफक टॅक्स आकारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून उच्च न्यायालयात देखील याबाबत दाद मागण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकर सुटण्याची अपेक्षा आहे.” – संपत गाडे, होर्डिंग व्यावसायिक