अहमदाबाद – गुजरातनजीकच्या भारतीय सागरी हद्दीत तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे आज सकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत एक नौकेत सुमारे 40 किलो हेरॉइन (Heroin) होते. त्याची किंमत साधारणपणे 200 कोटी आहे. याप्रकरणी बोटीवरील सहा पाकिस्तानी क्रू मेंबर्सना अटक करण्यात आली आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त पथकाने कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरापासून नजीक 33 सागरी मैलावर एक मच्छीमार नौका अडवली. ही नौका पाकिस्तानी होती आणि त्यात ड्रग्ज असल्याचे आढळले. गुजरातच्या किनाऱ्यावर उतरवल्यानंतर हे अंमलीपदार्थ रस्तामार्गे पंजाबमध्ये नेण्यात येणार होते, अशी माहिती एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिली.
एक संशयास्पद नौका गुजरातच्या किनाऱ्यावर येणार असल्याची खबर एटीएसला मिळाली होती. त्यानुसार तटरक्षक दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गुजरात एटीएस आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) चार दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये कारवाई करून तब्बल 200 कोटींचे हेरॉइन जप्त केले होते. स्क्रॅपच्या कंटेनरमध्ये ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानुसार कोलकाता बंदराजवळ छापा टाकण्यात आला होता.