पिंपरी – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयाला फोन करून गोरगरिबांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैस न दिल्यास बघून घेण्याचीही भाषा केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, आपला तो फोन तीन आठवड्यांपूर्वीच चोरीला गेला असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.
शहरातील एका नामांकित रुग्णालयास फोन करून मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले. आम्हाला करोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना मदत करायची आहे. त्यासाठी मी माझा पर्वतीमधील कार्यकर्ता पाठवितो. त्याच्याकडे ते पैसे द्या.
तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याची भाषाही फोनवरील त्या व्यक्तीने केली. फोनची माहिती देणाऱ्या ऍपवर देखील चंद्रकांत पाटील यांचे नाव आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या कार्यालयातून असा कोणताही फोन केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्याचा सल्लाही दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) याबाबत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी एका तरुणीशी संपर्क साधला. त्या तरुणीला चंद्रकांत पाटील यांच्या नावाने आलेल्या फोन नंबरबाबत विचारले असता, तो नंबर आपल्या वडिलांचा असल्याचे सांगितले. तसेच सदरचा मोबाइल 29 जून रोजी चोरीला गेल्याचीही माहिती दिली. जी व्यक्ती मोबाइलचा वापर करीत होती ती नारळ विक्रेती असून, त्यांनी आपल्या एका मित्राच्या नावावर ते सीमकार्ड खरेदी केले होते. सध्या तो मित्र कुठे आहे, याबाबत त्या नारळ विक्रेत्यालाही माहिती नाही.
वडिलांचे जुने सीमकार्ड बंद करून नवीन सीमकार्ड घेण्यासाठी नारळवाल्याची मुलगी मोबाइलची सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडे गेली होती. मात्र ज्याच्या नावावर सीमकार्ड आहे त्याच व्यक्तीला घेऊन या, असे सांगितल्याने त्यांनी नवीन सीमकार्ड घेण्याचा नाद सोडून दिला. मात्र फोन चोरीला गेल्याची तक्रार न दिल्यामुळे तो नारळवाला पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलीस आता त्या मोबाइल चोराचा शोध घेत आहेत.