Hardik Pandya Excluded : हार्दिक पंड्याला भारतीय वनडे संघातून का डावललं? बीसीसीआयने सांगितलं मोठं कारण

Hardik Pandya Excluded from ODI squad : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत शुबमन गिल पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा सांभाळणार असून, दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, या संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला स्थान न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हार्दिक पड्याला संघातून बाहेर का ठेवलं?
हार्दिक पंड्याला वनडे संघात स्थान न देण्यामागे बीसीसीआयने मोठे कारण स्पष्ट केले आहे. ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या (CoE) अधिकाऱ्यांनी हार्दिकला एका सामन्यात १० षटके गोलंदाजी करण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच, आगामी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ लक्षात घेता हार्दिकचा ‘वर्कलोड’ सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पूर्णपणे फिट राहावा, हा मुख्य उद्देश ठेवून त्याला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
२०२५ पासून वनडेपासून दूर –
हार्दिक पंड्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना २०२५ मध्ये ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये खेळला होता. त्यानंतर तो वनडे क्रिकेटपासून दूर आहे. २०१६ मध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने ९४ वनडे सामन्यांत १९०४ धावा केल्या आहेत आणि ९१ विकेट्स घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने दोन अर्धशतके आणि तीन विकेट्स घेत दमदार कामगिरी केली होती, तरीही त्याला वनडेसाठी अद्याप फिट मानले गेलेले नाही.
श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून वापसी –
निवड समितीने त्याच्या अनुभवावर विश्वास दाखवत त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे मुकलेला श्रेयस अय्यर आता फिट होऊन परतला आहे. मात्र, त्याला अद्याप बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’कडून (CoE) फिटनेस सर्टिफिकेट मिळालेले नाही. तरीही, मालिका सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या बहुतेक खेळाडूंना या मालिकेतही कायम ठेवण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा.
हेही वाचा – Hardik Pandya Century : ६,६,६,६,६…हार्दिकचा सुपरहिट शो! एकाच षटकात तब्बल इतक्या धावा कुटत झळकावलं शतक
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचे वेळापत्रक:
११ जानेवारी: पहिला वनडे (वडोदरा)
१४ जानेवारी: दुसरा वनडे (राजकोट)
१८ जानेवारी: तिसरा वनडे (इंदूर)





