- एकतर्फी कारवाई थांबविण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पिंपरी–चिंचवड शहरातील आठ ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होत असून त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. सहा महिन्यांमध्ये अजून एकही शहर फेरीवाला समितीची बैठक झालेली नसताना मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात येत असल्याचा आक्षेप घेत नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी–चिंचवड महापालिका भवनासमोर शुक्रवारी (दि.1) आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि पथारीधारक सहभागी झाले होते. नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी…स्मार्ट सिटी नको रोजीरोटी द्या… सनासुदीत व्यवसाय हिरावू नका… अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा पालिका भवनाकडे वळला.
यावेळी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले देशाच्या संसदेने सन 2014 मध्ये पथ विक्रेता अधिनियम हा कायदा केला आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका गोरगरीब फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेकायदेशीर रित्या फेरीवाल्यांना चिरडण्याचा प्रयत्न होत आहे.
शहराच्या विकासाला विरोध नाही मात्र त्या विकासामध्ये फेरीवाल्यांचे स्थान असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा हातगाडी, टपरीधारकांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी शहरातील विविध भागातून आलेल्या विक्रेत्यानी समस्या मांडल्या. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी व प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांच्याशी चर्चा केली त्यांनी पुढील आठवड्यामध्ये आयुक्त यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन दिले.
यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महिला विभागाच्या वृषाली पाटणे, वहिदा शेख, सुनंदा चिखले, शमा सय्यद, नंदा तेलगोटे, सुरेश देडे, किरण साडेकर, यासीन शेख,अमृत माने, काशीम तांबोळी, सखाराम केदार, तुकाराम माने, सलीम डांगे, संभाजी वाघमारे, सय्यद अली, राजू बोराडे, अमृत माने, इरफान मुल्ला, शारदा राक्षे, राजाभाऊ हाके, मनीषा ससाने, आत्मा गुप्ता, जयश्री कांबळे, नंदू आहेर, ओमप्रकाश मोरया, नितीन भराटे, आशा बनसोडे, सीमा गायकवाड, नंदू आहेर, प्रशांत गवई, सूरज देशमाने, सुधीर गुप्ता आदीसह शहरातील विक्रेते उपस्थित होते.