पुणे – शहरातील केंद्रशासन तसेच राज्यशासनाची कार्यालये तसेच त्यांच्या मिळकतींचाही तब्बल 100 कोटींचा मिळकतकर कर थकला असल्याचे समोर आले आहे. यात, राज्यशासनाच्या मिळकतींचा कर सर्वाधिक असून ही रक्कम सुमारे 70 कोटी 32 लाख आहे तर केंद्राच्या कार्यालयाच्या सुमारे 21 कोटी 41 लाख रुपयांचा मिळकतकर थकला आहे. त्यामुळे, महापालिकेकडून या कार्यालयांनाही पत्र पाठवून कर भरण्याची मागणी केली आहे.
शहरात केंद्रशासनाच्या सुमारे 92 मिळकती आहे. या मिळकतींच्या 2020-21 या आर्थिक वर्षाची कर मागणी 23.85 कोटी रुपयांची आहे. त्यातील, सुमारे 47 मिळकतींचा 2 कोटी 44 लाखांचा कर भरण्यात आला असून अद्यापही 60 मिळकतींचा 21 कोटी 41 लाख रुपयांचा कर थकीत आहे. तर राज्याच्या शासनाच्या अखत्यारीतील 330 मिळकती आहेत.
त्यांची या वर्षाची एकूण मागणी 76 कोटी 32 लाख रुपयांची असून त्यातील 180 मिळकतींचा सुमारे 6 कोटींचा कर आतापर्यंत भरण्यात आला असून राज्यशासनाचे 70 कोटी 32 लाख थकीत आहेत. या वर्षी करोनामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.
परिणामी, महापालिकेकडून शहरातील थकीत मिळकतकर वसूलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात, मोठ्या थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजनाही राबविलेली आहे. मात्र, त्याच वेळी शासकीय कार्यालयांनाही महापालिकेने पत्र पाठवून कर भरण्यासाठी सूचना करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.