मुंबई – काल शेअर बाजार निर्देशांकात मोठी घट झाल्यानंतर आज ती तूट भरून निघण्याची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर सेरीज डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट काल संपल्यामुळे आणि जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे आज खरेदी झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स एक टक्क्याने म्हणजे 431 अंकांनी वाढून 44,259 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 128 अंकांनी म्हणजे एक टक्क्यांनी वाढून 12,987 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, एचडीएफसी, एचसीएल टेक, ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, टायटन या कंपन्यांचे शेअर 5.15 टक्क्यापर्यंत वधारले. मात्र मारुती, ओएनजीसी, इंडसइंड बॅंक, टेक महिंद्रा, इन्फोसिस या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. बऱ्याच कंपन्यांनी लवकरच करोनावरील लस बाजारात आणण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत.
आजच्या तिचे नेतृत्व बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांनी केले. कर्जाची वसूली वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर व्याजदर कमी असल्यामुळे कर्जाचा उठाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जास्त प्रमाणात खरेदी झाली. त्याचबरोबर धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उद्या जाहीर होणार आहे. त्याबाबत गुंतवणूकदार आशावादी असल्याचे वातावरण बाजारात होते.