Google Gemini : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगलला त्यांच्या AI टूल जेमिनीबाबत कडक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित एका प्रश्नाला जेमिनीने दिलेल्या उत्तरामुळे गुगलला हा इशारा देण्यात आला आहे. राजीव यांच्या म्हणण्यानुसार, एआय टूल जेमिनीचे उत्तर हे आयटी नियमांचे तसेच फौजदारी संहितेच्या अनेक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
एका यूजरने गुगलच्या एआय चॅटटूल जेमिनीला विचारले होते की नरेंद्र मोदी फॅसिस्ट आहेत का ? या प्रश्नाच्या उत्तरात जेमिनी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. हिंदुत्ववादी धोरणे राबवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. काही तज्ञांनी याला फॅसिस्ट म्हटले आहे. हे आरोप अनेक पैलूंवर आधारित आहेत. यात भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचाही समावेश आहे. असे उत्तर त्या टूलने दिले.
गुगल जेमिनीवर पक्षपातीपणाचा आरोपही करण्यात आला आहे, कारण जेमिनीने मोदींना फॅसिस्ट म्हटले होते, तर जेव्हा हाच प्रश्न अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबद्दल विचारला गेला तेव्हा त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
जेमिनीचे हे उत्तर X वर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टला उत्तर देताना, राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की हे आयटी कायद्याच्या मध्यस्थ नियमांच्या नियम 3(1)(b) चे थेट उल्लंघन आहे आणि फौजदारी संहितेच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन आहे. गुगल इंडिया आणि गुगल एआय व्यतिरिक्त त्यांनी आयटी मंत्रालयालाही टॅग केले आहे.